महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार, तीन नव्हे आता चार पक्षाची आघाडी होणार
 
पुणे : कर्नाटकातील विजयानंतर महाविकास आघाडीमध्ये जोर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राज्यात मजबूत ताकदीने उभं राह्यचं आणि भाजपला नेस्तनाबूत करायचं असा विडाच आघाडीने उचलला आहे. ही आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीत आणखी एक भिडू जोडला जाण्याची शक्यता आहे. हा नवा भिडू महाविकास आघाडीत आल्यास महाविकास आघाडीची राज्यात प्रचंड ताकद निर्माण होणार असून त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात डोकं काढणंही मुश्किल होणार असल्याचं चित्र आहे.
महाविकास आघाडीची येत्या आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या दोन्ही निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीतीही ठरवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आंबेडकरांना निमंत्रण
महाविकास आघाडीच्या या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीत येण्याची इच्छा वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आंबेडकरांना या बैठकीचं आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. आंबेडकर या बैठकीला आल्यास वंचितला किती जागा सोडायच्या आणि कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच वंचितची जागांची अपेक्षा काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय समीकरणे बदलणार
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची ठाकरे गटाशी युती आहे. त्यामुळे ठाकरे गटाने वंचितला महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता वंचितला थेट महाविकास आघाडीत घेऊन जागा दिल्या जाणार की ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या जागांमधून वंचितला जागा सोडल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिल्यास राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात असं सांगितलं जात आहे.