ठाण्यातील मतदान केंद्रावर प्रदत्त मतपत्रिकेद्वारे मतदाराने बजावला मतदानाचा अधिकार
ठाणे:   ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८-ठाणे विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेले असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याचे मतदान केंद्र क्रमांक २७३ चे मतदान केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मतदार यांचे ओळखीची खात्री करुन मतदाराला मा. भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार व निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील निर्देशानुसार प्रदत्त मतपत्रिका (Tender Ballot Paper) देवून सदर मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला. 
एका मतदाराच्या नावे जर दुसऱ्या व्यक्तीने मतदान केले असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदर मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देवून त्यास मतदान करण्याची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   त्यानुसार 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातंर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक 273 वर झालेल्या प्रकारानंतर ओळखीची खात्री पटविल्यानंतर मूळ मतदाराने प्रदत्त मतपत्रिका भरुन मतदानाचा अधिकार बजावला आहे, असे 25 ठाणे मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी कळविले आहे.