रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका; सरकार अलर्ट
 
एपीएमसी न्यूज नेटवर्क: अयोध्येत उद्या सोमवारी श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यावेळी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळाही पार पडणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरापासून ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे. टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरून हे लाइव्ह प्रसारण होणार आहे. मात्र, असं असलं तरी या लाइव्ह प्रसारणावर सायबर हल्ल्याचा धोका आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी सायबर हल्ला होणार असल्याने सरकारने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी सर्व विभागाध्यक्षांना याबाबतच्या सख्त सूचना दिल्या आहेत. पुढचे तीन दिवस सरकारच्या कोणत्याही संकेतस्थळात नवी दुरुस्ती किंवा संशोधन केलं जाणार नाही. सरकारी वेबसाईट आणि पोर्टल हे सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवा, असे आदेशच मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी दिले आहेत.
पत्र जारी
मुख्य सचिवांनी सर्व प्रमुख सचिवांना एक पत्र लिहून सावधानतेचा इशारा दिला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापासून वाचण्यासाठी मुख्य सचिवांनी हे आदेश जारी केले आहेत. विभागीय वेबसाइट्सनाही सायबर हल्ल्याच्या सूचना देणारं पत्र पाठवण्यात आलं आहे. सोमवारी अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला देशातील कोट्यवधी लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उपस्थित राहणार आहेत. इंटरनेटवरूनही हा सोहळा लाइव्ह दाखवला जाणार आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
डेटा सुरक्षित ठेवा
देशविदेशातील हॅकर्स सरकारच्या डेटामध्ये छेडछाड करू शकतात. सायबर हल्ला करू शकतात. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना करतेवेळी संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, अशा सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत. यूपी सरकारचे मुख्यसचिव मिश्र यांनी सर्व विभागांना त्यांच्या सर्व वेबसाईट्स आणि पोर्टलचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
असे आहे अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्याचे निमंत्रण
रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे, तर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून. त्याच न्यायाने राष्ट्रवादीच्या दुसर्या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर इत्यादी नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
क्रिकेट, सिनेमा, उद्योग इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटीजना सुद्धा निमंत्रण दिलंय
देशातील कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही. केवळ राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उत्तरप्रदेशात कार्यक्रम होत असल्याने तेथील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रण
भाजपाचे निमंत्रण हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांना. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांना निमंत्रण नाही.
याशिवाय, 8000 निमंत्रितांमध्ये मोठा घटक हा देशभरातील संत-महंत आहे. महाराष्ट्रातून अशा 409 संत-महतांना निमंत्रण दिलं गेलंय.