ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! एका दिवसात शेअर बाजार कोसळला, 5 लाख कोटी स्वाहा,बाजारात भूकंप कशामुळं?

एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीवर तब्बल 50% टॅरिफ लावल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळला. परिणामी, भारतीय शेअर बाजारात विक्रीचा स्फोट झाला आणि केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी रुपये हवेत विरले.
मे महिन्यानंतर प्रथमच सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली घसरून 79,857.79 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 24,363 वर आला. सलग सहाव्या आठवड्याला बाजारात नुकसान नोंदले गेले असून रिअल्टी आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक फटका बसला.
गेल्या महिन्यात निफ्टी आयटी निर्देशांकात 10% घसरण झाली असून, बँकिंग क्षेत्रातही तेजीचा लवलेश नाही. कमजोर तिमाही निकाल, वाढता आर्थिक दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री यामुळे बाजारातील घसरणीला आणखी खतपाणी मिळाले.