मुंबई एपीएमसीच्या सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणी दोन जणांना अटक
 
Mumbai Apmc Toilet Scam:   नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शौचालय घोटाळा झाला असून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात अजून दोन जणांची भर पडली असून नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरेश मारू व मनीष पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून हे दोघेही शौचालय चालवणारे कंत्राटदार आहेत.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजार समितीतील शौचालय कंत्राटात मोठ्या प्रमाणात घोटाळा   झाला असल्याचे   फेर चौकशीत निष्पन्न झाले असून तब्बल सात कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह निवृत्त अधिकारी आणि सध्या कार्यरत अधिकाऱ्यांच्या विरोधात शासनाच्या निर्देशानंतर ही तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या तपासाला आता गती आली असून या घोटाळ्यात आणखी दोन आरोपींवर गुन्हा दाखल   करण्यात आल्या नंतर त्यांना अटक करण्यात आली. सुरेश मारू व मनीष पाटील अशी यांची नावे असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवार २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली आहे.