केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन
 
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आहेत. ते आज दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते वांद्रे येथे गेले. अमित शाह यांनी वांद्रे येथे जावून भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते वरळी सी लिंक मार्गाने लालबागच्या दिशेला रवाना झाले. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अमित शाह यांनी आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. शाह दरवर्षी मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. ते यावर्षीदेखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. लालबागच्या राजाची नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. तसेच अनेक सेलिब्रेटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. बॉलिवूडचे कलाकार, मराठी कलाकार तसेच अनेक बडे राजकीय नेते लालबागच्या दर्शनासाठी येतात. अमित शाह यांनीदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
अमित शाह दर्शनाला येतील म्हणून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी काही काळासाठी दर्शन बंद ठेवण्यात आलं. सर्व मंडप रिकामा करण्यात आला. लालबागच्या राजाच्या मंडळातील कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आलं. फक्त काही महिला स्वयंसेवक आणि मंडळाचे मोजके स्वयंसेवक आणि पोलीस मंडपात होते.
अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले. तसेच भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे यांच्यासह अनेक इतर नेते देखील इथे उपस्थित होते. अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी निघाले. त्यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. नंतर पुन्हा मुंबई विमानतळावर दाखल होऊन दिल्लीच्या दिशेला रवाना होणार आहेत.
अजित पवार अमित शाह यांच्यासोबत का नाही आले?
दरम्यान, अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत नाहीत. ते आपल्या नियोजित बारामती दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शाह यांच्यासोबत जाऊ शकले नाहीत. पण राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलंय.