दिग्गज नेत्यांनी अर्ज भरण्यासाठी निवडला 24 कॅरेट मुहूर्त, एकाच दिवशी का सर्वांची धडपड?
मुंबई: विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील सर्व 288 मतदारसंघात एकाच दिवशी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी   22 ते 29 ऑक्टोबर हा आठ दिवसांचा कालावधी असला तरी बहुतेक दिग्गज उमेदवार 24 ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार आहेत.
कोण भरणार 24 तारखेला अर्ज?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार,अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील,   मनसेचे ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव, आणि त्यांच्यासोबत असंख्य इच्छुक उमेदवारांनी, अर्ज भरण्यासाठी 24 तारीख निवडली. या निमित्ताने सगळ्यांना 24 तारखेलाच अर्ज का भरायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सर्व उमेदवार 24 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची धडपड का करत आहेत याचं खास कारण आहे.
काय आहे महत्त्व?
24 ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग शुभ दिवस मानला जातो. त्या दिवशी नवीन वस्तू, वाहन, सोने खरेदी करणं लाभदायक असतं असं मानलं जातं. वर्षांतून दोन ते चारवेळाच हा योग जुळून येतो. त्यानुसार, गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी हा गुरुपुष्यामृत योग आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काळातच हा योग आल्यानं त्या दिवसाचा मुहूर्त साधून अर्ज भरण्याची सर्वांची धडपड आहे.
ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 आणि 23 तारीख मिथून सिंह आणि कुंभ राशीसाठी शुभ आहे 24 आणि 25 तारीख कर्क,कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या उमेदवारांना शुभ आहे. 26 आणि 27 तारीख   सिंह, तूळ,मेष , धनू राशीच्या उमेदवारांना लाभदायक आहेत. 28 आणि 29 तारखेला कन्या, वृषभ,वृश्चिक आणि मकर राशीच्या उमेदवारांनी अर्ज भरावेत, असा ज्योतिष्याचा सल्ला आहे.
राजकारणी व्यक्ती आणि ज्योतिष यांचं नातं जवळची असल्याची अनेक उदाहरणं आहेत. सामान्य भारतीय हे सश्रद्ध आणि देवभोळे असतात. राजकीय नेते देखील त्याला अपवाद नाहीत. निवडणुकांच्या दिवसात तर कोणतीही रिस्क न घेता काम करण्याची त्यांची धडपड असते. त्याचत अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये गुरुपुष्यामृत योग   म्हणजे तर राजकारण्यासाठी 'या सम हाच' दिवस आहे. त्यामुळे त्या दिवशी अर्ज भरण्याची सर्वांची धडपड आहे. यापैकी किती जणांची धडपड फळाला येते हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.