Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; हवामानाचा अंदाज एका क्लिकवर
अंदमान- निकोबार बेट (Andaman Nicobar) समुहांमध्ये असणाऱ्या मान्सूननं आगेकूच करण्यास सुरुवात केलेली असतानाच आता तो संपूर्ण देशभरात कधी विस्तारतो याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली आहे. दरम्यान मान्सून येण्याआधी देशातील आणि मुख्यत्वे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही अधिक असल्यामुळं तापमानाचा हा दाह अधिक असल्याचं भासत आहे. याच उष्णतेनं होरपळून निघणाऱ्यांसाठी एक दिलासा म्हणजे मान्सूच्या आधी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा होणार आहे.
हवामान विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण असेल, तर काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत. इतकंच नव्हे, तर काही भागांमध्ये सोसाट्याचा वाराही सुटेल असा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे.
देशभरातील तापमानात घट?
तुम्ही सध्याच्या दिवसांमध्ये एखाद्या ठिकाणी पर्यटनाच्या हेतूनं जाणार असाल तर, हवामान तुम्हाला फार त्रास देणार नाही. कारण, सध्या सक्रीय असणाऱ्या एका पश्चिमी झंझावातामुळं देशभरातील तापमानात काही अंशांनी घट नोंदवली जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
एक पश्चिमी झंझावात देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पठारी भागाच्या दिशेनं निघाला आहे. तर, चक्रवातसदृश वारे पंजाब आणि पाकिस्तान प्रांतावर घोंगावत आहेत. याच वाऱ्याचा एक झोत पश्चिम बंगालच्या दिशेनंही गेला आहे. महाराष्ट्रावरही या वाऱ्याचे काही अंशी परिणाम होताना दिसत आहेत.