राज्यातील कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस पडणार, महाराष्ट्रात कधीपासून बरसणार
 
पुणे : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात चांगली बातमी दिली आहे. मान्सूनने आगेकूच सुरु केली आहे. राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार आहे.
केरळमध्ये 4 जून रोजी म्हणजेच रविवारी मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर मान्सूनच्या प्रगतीत काही अडथळा आला नाही तर त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेनं सुरु होईल आणि राज्यात 10 जूनला पाऊस पडणार आहे. IMDकडून नैऋत्य मान्सूनबद्दल वारंवार अपडेट्स येत आहे. आता मॉन्सून ट्रॅकिंगच्या अपडेटबाबत IMD ने ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. त्यानुसार, मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, मालदीव क्षेत्रामध्ये, दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे.
यंदा राज्यात कसा असणार पाऊस
राज्यात यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस असणार आहे. यामुळे हा पाऊस सामान्य असणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात जून, जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पण राज्यभर यंदा पावसाचे प्रमाण सरासरीसारखे आहे. 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भासाठी मात्र गुड न्यूज आहे. विदर्भात यंदा 100 टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
पुढील ४८ तासांत काय?
पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सून पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे IMD ने म्हटले आहे.
जळगावात यलो अलर्ट
दोन दिवस जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. याबाबत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दुपारपर्यंत जिल्ह्यात उष्ण तापमान राहणार असले, तरी संध्याकाळनंतर मात्र जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.