काँग्रेसमध्ये सुपारीबाज कोण त्यांची नावे जाहीर करणार; प्रकाश आंबेडकारांचा सर्वात मोठा इशारा
 
मुंबई   : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपासाठी सातत्याने बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. पण तरीदेखील काही गोष्टी अजूनही हव्या तशा झालेल्या नाहीत. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सहभागी करुन घेतलं असलं तरी जागावाटपाबाबत हवी तशी चर्चा होताना दिसत नाहीय. महाविकास आघाडी वंचितसाठी किती जागा सोडणार ते समोर येईलच. पण वंचित महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार का? याबाबत अजूनही सस्पेन्स आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तशा सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. आता तर त्यांनी काँग्रेसला मोठा इशाराच दिला आहे. काँग्रेसमध्ये सुपारीबाज कोण आहेत त्यांची नावे तीन दिवसांनी जाहीर करणार, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी या नेत्यांना पक्षातून काढावं”, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
“ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. ईव्हीएम टेंपर्ड होऊ शकतो. नेमकं मत कुणाला गेलंय हे कळायला पाहीजे. मतांची टॅली व्हायला हवी”, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया दिली. “अद्यापही महाविकास आघाडीचा जागेचा तिढा सुटला नाहीय. 15 जागांवर मतभेद आहेत, आज बैठक होती. ती रद्द झाली. हे देखील त्यांनी आम्हाला सांगितलं नाहीय. त्यामुळे जेव्हा ते बोलवताल तेव्हा आम्ही जाऊ. आमची भूमिका त्यानंतर मांडू”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.
‘जरांगे यांच्यामुळे मतं विभागली जाणार’
“मतांचं ध्रूवीकरण झालंय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मतं विभागली जाणार आहेत. याचे निवडणुकीत पडसाद उमटणार आहेत”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: सोबत आमदार, खासदार घेऊन आले आहेत. त्यांना शाबूत ठेवण्यात भाजप त्यांना किती मदत करेल? हा मोठा प्रश्न आहे”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
‘आमच्यावर कुणी कितीही रंग टाकू द्यात…’
“राजकीय खेळी भाग म्हणून “सुबह का भूल शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते” असं म्हणतात. या युक्तीवर का होईना राजकारण व्हायला हवं”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना सल्ला दिला. “आमच्यावर कुणी कितीही रंग टाकू द्यात, पण आम्ही तोच रंग घेऊ जो आम्हाला हवाय. कुणाचाही रंग आम्ही घेणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.