Woman Property Rights : पती आणि सासरच्या संपत्तीत पत्नीचा हक्क काय? तुम्ही जाणून घेतलंय कधी
नवी दिल्ली   : कायद्याने भारतीय महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत ( Rights of Property) समान वाटा मिळतो. त्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाच्या निकालाने आणि कायद्याने त्यांना प्राप्त झाले आहेत. काही वेळा आपसी समझोत्याने महिला त्यांचा वाटा सोडतात. त्याला हक्कसोड म्हणतात. काही महिला तर वडिलांच्या संपत्तीत हक्क पण सांगत नाही. कुटुंब एकत्र राहावे. भावाला त्रास होऊ नये यासाठी त्या मन मोठे करतात. काही ठिकाणी मात्र प्रकरण कोर्टापर्यंत जाते. पण पतीच्या आणि सासरच्या संपत्ती महिलेला किती अधिकार असतो? सासरच्या संपत्तीत (Woman Property Rights) तिला किती वाटा मिळतो? अनेकांना आजही वाटते की या संपत्तीवर पत्नीचा संपूर्ण अधिकार असतो. पण खरंच तसं आहे का?
पतीच्या संपत्तीत पत्नीचा अधिकार काय?
सर्वसाधारपणे असे मानल्या जाते की पतीच्या संपत्तीत पत्नीचा पूर्ण अधिकार असतो. पण खरंच असं असतं का? तर तसं नसतं. पत्नीसोबतच कुटुंबातील इतर लोकांचे हक्क पण सुरक्षित असतात. त्यांचा पण अधिकार असतो. पतीची कमाई असेल तर त्यात केवळ पत्नीचाच पूर्ण हक्क नसतो. त्यात आई आणि मुलांचा पण हक्क अबाधित असतो.
वारसदाराचा अधिकार
एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी त्याचे इच्छापत्र तयार केले आणि त्यात वारस म्हणून पत्नीचे नाव घेतले, तर संपत्तीचा अधिकार तिला मिळतो. इच्छापत्र तयार न करता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, तर या संपत्तीत पत्नी, आई आणि मुलांचा समान वाटा असतो.
सासरच्या संपत्तीत किती वाटा
पतीच्या मृत्यूनंतर महिलेला पतीच्या वडिलांकडील संपत्तीवर अधिकार असतो का? तर संपूर्ण अधिकार नसतो. पण सासरकडील मंडळी महिलेला घराबाहेर काढू शकत नाही. महिलेने दावा केल्यास तिला सासरकडील मंडळीकडून पोटगी मागता येतो. सासरकडील मंडळींच्या आर्थिक स्थितीनुसार न्यायालय अशा प्रकरणात मेंटेनेंसची रक्कम ठरवते. मुलं असतील तर वडिलांच्या संपत्तीत त्यांना वाटा मिळतो. जर महिलेने दुसरे लग्न केले तर तिच्या मेंटेनेंस बंद होतो.
घटस्फोटानंतर किती अधिकार
पतीपासून विभक्त राहणे आणि घटस्फोट घेऊन वेगळे राहणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. पण फारकत घेतल्यानंतरही पत्नी पतीकडून पोटगी मागू शकते. महिन्याला अथवा एकदाच सर्व रक्कम देणे, असे पोटगीचे दोन प्रकार असतात. घटस्फोटानंतर मुलं आईसोबत राहत असतील तर पतीला त्यांचा खर्च उचलावा लागतो. घटस्फोटानंतर पत्नीचा पतीच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो. पण मुलांचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असतो. एखादी संपत्ती पती-पत्नीच्या नावावर असेल तर त्यामध्ये दोघांचा समान अधिकार असतो.