डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या ; निकृष्ट आनंदाचा शिधा’मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर
 
नवी मुंबई : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, पामतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तू दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटप केल्याची तक्रारी येत आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. तसेच ही गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे, अशा शब्दात राज्य सरकारवर टीका केली.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला 'आनंदाचा शिधा' हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. ही गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध, अशा शब्दात संताप व्यक्त केला.
दिवाळीत आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयांत सहा वस्तू देण्याचा उपक्रमास सुरुवात झाली. मात्र, दिवाळी असूनही अनेक ठिकाणी सहा वस्तूंचे किट्स अद्याप पोहोचले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांसह रेशन विक्रेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी सहापैकी तीन वस्तू तर काही ठिकाणी वस्तू त्या गोदामात येऊनही लाभार्थ्यांना मिळाल्या नसल्याचे समोर आले आहे.