यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पावसासोबत गारपीटही झाली ,शेतकरी पुन्हा अडचणीत .
 
यवतमाळ : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. आर्णी, उमरखेड, बाभूळगाव, पुसद, महागाव, राळेगाव, दारव्हा या तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील टीनपत्रे उडाले, तर काही ठिकाणी मोठमोठाले झाड उन्मळून पडले.
वाऱ्याचा सोसाटा प्रचंड असल्याने प्रत्येकजण सुरक्षित ठिकाणी थांबला होता. या वादळात सुदैवाने कुठेही जीवित हानी झाली नाही. मात्र, वादळाचे रौद्ररूप थरकाप उडविणारे होते. आर्णी तालुक्यातील जवळा येथे सूरज गावंडे या युवकाच्या घरावर निंबाचे झाड कोसळले. कुन्हा तळणी परिसरातील बोरगाव पुंजी, पहूर, नस्करी, तळणी, भांबोरा या गावांमध्ये वादळाचा तडाखा बसला. रब्बीतील गहू, ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लोणी येथे गारपीट झाल्याने हरभरा, गहू, तीळ या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. क्षणातच हातचे पीक मातीमोल झाले. बाजार समितीमध्ये उघड्यावर असलेले शेतकऱ्यांचे धान्य ओले झाले.
दारव्हा तालुक्यात वादळाने खोपडी, डोल्हारी, देऊळगाव, अंतरगाव येथे मोठे नुकसान केले. शेतातील भाजीपाला, फळबागा याला मोठा फटका बसला. पपईची झाडे अर्ध्यातून तुटून खाली पडली. काही मिनिट झालेल्या वादळाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे.
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण १८ ते २१ पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भातील, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या   निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे . आता प्रशासनानेच   शेतीच्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतीच्या   बांधावर जाऊन पंचनामे करावेत तसेच   शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.