Agriculture Commodity Market :हळदीच्या हजर आणि वायदे बाजारात तफावत
Agriculture commodity Market: 12 मे रोजी संपलेल्या सप्ताहात सर्व पिकांची आवक गेल्या सप्ताहांच्या तुलनेने लक्षणीय वाढली. एक एप्रिलपासून कांद्याची साप्ताहिक आवक जवळ जवळ ३.७५ लाख टन आहे.ती अजून कमी होण्याची लक्षणे नाहीत. या सप्ताहात तर तिने ४.७१ लाख टनाची पातळी गाठली. टोमॅटोची साप्ताहिक सरासरी आवकसुद्धा गेल्या ४५ दिवसांत ७५,००० टन आहे.
या सप्ताहात ती ८७,००० हजार टनांवर गेली आहे. यामुळे कांदा व टोमॅटो यांच्या किमती नीचांकी पातळीवर गेले काही दिवस टिकून आहेत.
मे महिन्यात आतापर्यंत कापूस, मका व सोयाबीन यांच्या किमती घसरत आहेत. हळदीच्या भावात तेजी आहे. परंतु स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे किफायतशीर ठरेल.
१९ मे रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६०,१६० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.८ टक्क्याने घसरून रु. ५९,६६० वर आले आहेत. जून फ्यूचर्स भाव १.२ टक्क्याने घसरून रु. ६०,९६० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स रु. ६३,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५०८ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा २.७ टक्क्यांनी घसरून रु. १,४६८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५५० वर आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात मात्र त्या ०.३ टक्क्याने वाढून रु. १,८०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून डिलिव्हरी) किमतीसुद्धा ०.१ टक्क्याने वाढून रु. १,८११ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १,८३२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात २.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,२३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ५.६ टक्क्यांनी वाढून रु. ७,६३६ वर आल्या आहेत.
जून फ्यूचर्स किमती २.५ टक्क्यांनी वाढून रु. ८,२२२ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. ८,५५० वर आल्या आहेत स्पॉट भावापेक्षा त्या १२ टक्क्यांनी अधिक आहेत. ऑक्टोबर भावसुद्धा (रु. ८,८७८) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला अनुकूल संधी आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,९१३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्याने वाढून रु. ४,९५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ८,२०० वर स्थिर आहे. आवक कमी आहे. मे महिन्यात किमतीत वाढीचा कल आहे.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) ०.५ टक्क्याने घसरून रु. ५,३०३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा २.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,१८९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.