'अहो शेठ लय दिवसानं झाली या भेट': बाजार समिती निकालानंतर वसंतराव मानकुमरेंचा पुन्हा डान्स
सातारा: सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात सातारा जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली. तर महाविकास आघाडीच्या पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी 'अहो शेठ लय दिवसानं झाली या भेट' या गाण्यावर बेभान होऊन डान्स केला.
जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पॅनेलमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. या ठिकाणी सत्ताधारी पॅनलने विजय मिळवला. पॅनेलचा विजय झाल्यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंरे यांनी देखील सहभागी होत 'अहो शेठ लय दिवसानं झाली भेट', पाटलांचा बैलगाडा, या लावणीवर तुफान डान्स केला.
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. यापूर्वी असाच डान्स वसंतराव मानकुमरे यांनी चैत्राली राजे यांच्या रंगमंचावर देखील केला होता. जावळी महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे गटाने बाजी मारली. त्यामुळे विजयी जल्लोष करताना मानकुमरे यांनी डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले