Alibaug APMC Election : अलिबाग बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका
Alibaug Election   : अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह सर्व उमेदवारांचा पराभव झाला. शुक्रवारी अलिबागमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १४९३ पैकी १३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान, महाविकास आघाडीने बहुसंख्य उमेदवार बिनविरोध निवडून आणून यापूर्वीच वर्चस्व मिळवले आहे मात्र काही जागांवर शिंदे गट आणि भाजपने आपले अस्तित्व दाखवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांपैकी ७ बिनविरोध तर ११ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांसाठी १३, ग्रामपंचायती मतदारसंघात ४ जागांसाठी ६, व्यापारी, आडते मतदारसंघात २ जागांसाठी ३ तर हमाल व्यापारी मतदार संघात महाविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे.शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भोपी यांना ५३८ तर यशवंत भगत यांना ५१८ मते मिळाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा कैणी आणि शैलेश पाटील यांचा दारुण पराभव झाला.
उमेदवारांचा जल्लोष
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे सलीम तांडेल, अनंत पाटील, संजय पाटील, स्वप्नील पाटील, यशवंत भगत, अशोक म्हात्रे, कमळाकर साखळे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर शिंदे गटाच्या नंदन पाटील आणि संदेश थळे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.व्यापारी आणि अडत्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतीक पाटील तसेच सुभाष वागळे यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे संजय भावे यांना पराभूत केले.
भिवंडीत भाजप-शिवसेना महायुतीचा विजय
वज्रेश्वरी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) भाजप-शिवसेना-श्रमजीवी संघटना युतीने पूर्ण बहुमत मिळवून बाजार समितीवर युतीचे वर्चस्व कायम ठेवले आहे.केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी आखलेल्या रणनीतीमुळे भाजप-शिवसेना युतीने १८ पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे.भिवंडीत मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासून भाजप-शिवसेना-श्रमजीवी संघटना महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. अखेर १८ जागांपैकी १० जागावर युतीने विजय मिळवला तर महाविकास आघाडीला केवळ आठ जागा मिळाल्या.