अमरावती बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या हाती, अंगणवाडी सेविकेच्या मुलाची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड
अमरावती : राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. बाजार समिती आपल्या ताब्यात राहावी, यासाठी बहुतेक सर्व पक्षांनी प्रयत्न केले. पण, स्थानिक पातळीवर या निवडणुका लढल्या जातात. त्यामुळे प्रत्येक बाजार समितीचे गणित वेगवेगळे होते. अमरावती कृषी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. यावेळी काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता काबीज केली होती. आज महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता तथा अंगणवाडी सेविका शेतकरी मुलगा हरीष मोरे यांची सर्वानुमते सभापती पदी निवड करण्यात आली. उपसभापती पदी शिवसेनेचे भय्यासाहेब निर्मळ यांची निवड झाली. यावेळी आमदार यशोमती ठाकूर या स्वतः जल्लोषात सहभागी झाल्या. यावेळी नवनिर्वाचित सभापती हरीश मोरे बोलताना भावुक झाले होते.
राजकीय वारसा नसताना निवड
नवनिर्वाचित सभापती हरीश मोरे म्हणाले, माझा कोणताही राजकीय वारसा नाही. यशोमती ठाकूर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला संधी दिली. सर्व संचालक मंडळाने माझी एकमताने निवड केली. सहकारी मित्र तसेच शेतकरी मित्र पाठीशी उभे राहिले. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणार. बाजार समितीच्या कायापालट कसा करता येईल, याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं हरीश मोरे म्हणाले.
अंगणवाडी सेविकेचा मुलगा सभापती
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, अंगणवाडी सेविकेचा मुलगा आहे. त्यांचा संघर्ष सगळ्यांनी बघितला आहे. प्रामाणिक असल्याने त्यांची निवड केली. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई मोठी लढाई होती. सत्तेची जीत होते. शेतकऱ्याचा पोरगा सभापती झाला. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत. अभी तो झाकी हैं. पिक्चर अभी बाकी आहे, असं म्हंटलं.
शेतकऱ्यांच्या हिताची काम झाली पाहिजेत. नवीन तंत्रज्ञान काय उपलब्ध करून देता येईल. चांगल्या प्रकारचे जेवण कसे उपलब्ध करून देता येईल, यावर काम करायचं आहे. व्यापाऱ्यांचा माल आतमध्ये आणि शेतकऱ्यांचा माल बाहेर, अशी परिस्थिती आधी राहत होती. आता निवडून आलेले शेतकऱ्यांची मुलं आहेत. हे लाज राखतील, असा आमचा विश्वास असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.