Apmc Election In Parbhani : जिंतूर, बोरी, सेलूत युती-महाविकास आघाडीत काटे कि टक्कर
parbhani परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील जिंतूर, बोरी आणि सेलू या तीन महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agriculture Produce Market Committee) संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणीत पॅनेल आणि महाविकास आघाडी प्रणीत पॅनेल मध्ये थेट लढत होणार आहे. या तीन बाजार समित्यांतील निवडणूक जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरणार आहेत.
महाविकास’चे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांच्या नेतेमंडळींनी एकजुटीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे जिंतूर विधानसभा मतदार संघातील तीनही बाजार समित्यांमध्ये माजी आमदार बोर्डीकर, विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलपुढे महाविकास आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे.
जिंतूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ३६ उमेदवार आहेत. त्यामुळे थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीच्या जय नृसिंह शेतकरी विकास पॅनेलचे ज्ञानेश्वर गायकवाड, रवींद्र घुगे, मुरलीधर मते, रामनिवास गोवर्धन, विश्वनाथ राठोड तर भाजपा पॅनेलचे गंगाधर कदम, कृष्णकांत मोरे, प्रमोद चव्हाण हे प्रमुख उमेदवार आहेत.
बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. संचालकांच्या १८ जागांसाठी ३७ उमेदवार आहेत.
महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या माजी जि. प. सदस्य लिंबाजी ईखे, माजी पं. स. सभापती विजय खिस्ते, केशव बुधवंत, संतोष चौधरी, संजय लड्डा, नारायण खापरे यांचा तर भाजपा प्रणीत तुळजाभवानी ‘शेतकरी’चे. सुरेश खिस्ते, यशवंत चौधरी, हनुमान सोमाणी, आत्माराम पवार, स्नेहा रोहिणकर आदी उमेदवारांचा समावेश आहे.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३८ उमेदवार आहेत. भाजपा प्रणीत पॅनेलमध्ये प्रसाद डासाळकर, संजय रोडगे तर महाविकास आघाडी पॅनेलमध्ये माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, पुरुषोत्तम पावडे आदी प्रमुख उमेदवार आहेत.