सांगली APMCत नव्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी 15 हजार रुपये दर
सांगली : यंदाच्या हंगामातील हळदीची काढणी सुरू झाली असून येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. २) नवीन हळदीची १०२० पोत्यांची आवक झाली. नव्या हळदीच्या सौद्यांचा प्रारंभ जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. नव्या हळदीला प्रतिक्विंटल १०५०० ते ३१००० तर सरासरी १५००० हजार रुपये दर मिळाला.
सांगली बाजार समितीत श्री गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी येथील जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीत नव्या हळदीचे सौदे काढण्यात आले. या वेळी बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील, सचिव महेश चव्हाण, उपसचिव नितीन कोळसे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा, व्यापारी मनोहर सारडा, दिलीप आरवाडे, संचालक मंडळ, व्यापारी उपस्थित होते.
सांगली बाजार समितीत यंदाच्या हंगामातील राजापूरी हळदीची ८२५ पोती तर परपेठ हळदीची १९५ पोती अशी एकूण १०२० पोत्यांची आवक झाली. हळदीचे सौदे ११ दुकानांत काढण्यात आले. जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानात बावची येथील शेतकरी राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल ३१००० हजार रुपये दर मिळाला.
राजेंद्र पाटील यांची हळद दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने खरेदी केली. नवीन बाजार समिती ही हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे असून शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल खुल्या सौद्यांमध्ये हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले.
महिनाभर दर टिकून राहण्याचा अंदाज
सध्या हळद काढणीला फारशी गती नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून बाजार समितीत नव्या हळदीची आवक वाढेल. सध्या दर्जेदार हळद बाजारात आल्याने दर चांगले असून येत्या महिनाभर दर टिकून राहतील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.