BIG BREAKING | एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची उद्या भेट, मोठ्या हालचालींचे संकेत?
जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उद्या भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे उद्या उपस्थित असणार आहेत. यावेळी खडसे यांची पंकजा मुंडे, त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी पंकजा यांच्या भेटीआधी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा यांनी नुकतंच मी भाजपची नाही तर भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. “भाजपमध्ये अस्वस्थथा आहे”, असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं आहे.
पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी आहे. पंकजा मुंडे यांनी ज्या शब्दांमध्ये आपली उद्विग्नता व्यक्त केलीय ती अतिशय वेदनादायी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभं आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्था असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षानुवर्ष ज्यांनी वाढवला, बहुजनांपर्यंत पोहोचला, अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ होतोय”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
“पंकजा ताई यांची अशी अवस्था असणं म्हणजे भाजपमध्ये एकमेकांमध्ये अस्वस्थता आहे. पंकजा मुंडे यांनी मला ऊस तोडायला जावं लागेल, महादेव जानकर यांना मेंढ्या पाळायला जावं लागेल, हे वक्तव्य उद्विग्नतेतून काढलेलं आहे. हे वक्तव्य दुर्देवी आहे. भाजपमध्ये अनेक वर्ष काम करुन बहुजन समाजापर्यंत हा पक्ष पोहोचवला अशा जुना कार्यकर्त्यांचा छळ मोठ्या प्रमाणात होत आहे, दुर्लक्षित केलं जातंय, त्यांचा वारंवार अपमान केला जातोय”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे यांचं गोपीनाथ गडावरुनच बंड
गेल्या दोन-तीन वर्षांपासूनचे गोपीनाथ गडावरील कार्यक्रमांचा इतिहास पाहिला तर तो महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर जाहीर कार्यक्रमात धडाकेबाज भाषण केलं होतं. त्या कार्यक्रमात मंचावर भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेच काही दिवसांनी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.