BIG BREAKING | पंकजा मुंडे यांच्याकडून अधिकृतपणे दुजोरा, भाऊ-बहीण एकत्र निवडणूक लढणार
पुणे : बीड जिल्ह्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेतले परस्पर विरोधक साखर कारखाना निवडणूक एकत्र लढणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखाना निवडणुकीत पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे एकत्र आले आहेत. आम्ही एकत्रित पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलोय, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.
भाजपची आज पुण्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील आले आहेत. याच बैठकीला पंकजा मुंडे देखील आल्या होत्या.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
“आम्ही एकत्र पॅनल केलेलं आहे. आम्ही कारखान्याच्या हितासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी सहकारी कारखान्यात आम्ही एकत्र आहोत”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
पकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर दोन्ही भावा-बहिणीतल राजकीय वैर प्रकर्षाने समोर आलं होतं. याशिवाय बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोघांमधील संघर्ष उफाळून बाहेर येतो. अनेकदा दोन्ही भाऊ-बहीण हे एखाद्या समाजिक कार्यक्रमात एकाच मंचावरही दिसतात. पण ते एकाच मंचावरुन एकमेकांना टोला लगावण्याची एकही संधी सोडत नाही. दोघांकडून आपणच जिल्ह्यात जास्त विकासकामे केल्याचा दावा केला जातो.
बीड जिल्ह्यात नुकतंच जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी बघायला मिळाली. पण गोपीनाथ गडावर असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात दोन्ही बाजूने संयम पाळला जाताना दिसतोय. विशेष म्हणजे बीडच्या राजकारणात पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येऊन वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ठरवली आहे. त्यामुळे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुंडे बंधू-भगिनी एकत्र आल्याचं चित्र आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यात 21 जागांच्या संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक पार पडत आहेत. या निवडणुकीत दोन्ही बाजून सामंजस्याने मार्ग काढण्यात आला आहे. 21 पैकी 11 जागांवर पंकजा मुंडे गटाचे उमेदवार असतील. तर 10 जागांवर धनंजय मुंडे गटाचे उमेदवार असतील. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर धनंजय मुंडे यांनी स्वत: अर्ज दाखल केलेला नाही.