BIG BREAKING | रायगडच्या निलंबित पोलीस उपनिरीक्षकानेच लुटली जळगावातील स्टेट बँक
जळगाव : जळगाव शहर हे सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. जळगावचं सोनं अस्सल सोनं म्हणून ओळखलं जातं. इथले माणसंही तितकेच गोड. त्यांच्या मधाळ अहिराणी भाषेत वेगळीच माया. पण हे शहर गुरुवारी (1 जून) हादरलं. कारण भर दिवसा जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मोठा दरोडा पडला. संपूर्ण शहरातील नागरिकांना या घटनेमुळे मानसिक धक्का बसला. संपूर्ण जिल्ह्यात या दरोड्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे पोलिसांसमोरही आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान बनलं. पण पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता बेधडकपणे कारवाई केली. त्यामुळे अवघ्या 24 तासात दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.
विशेष म्हणजे दरोडखोरांमधील मुख्य सूत्रधार हा निलंबित पीएसआय असल्याची माहिती समोर आलीय. तसेच या गुन्ह्यात बँकेच्या शिपायाचादेखील सहभाग होता. मनोज सूर्यवंशी असं या बँकेतील शिपायाचं नाव आहे. तो बँकेत रोजंदारीवर शिपाईची नोकरी करायचा. बँकेचा शिपाई असल्याने त्याला बँकेच्या शाखेतील इत्यंभूत माहिती होती. याच गोष्टीचा त्याने फायदा उचलला. त्याने आपला पाहुणा निलंबित पीएसआय शंकर जासक याला बँकेच्या कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बँकेत दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार त्यांनी बँकेत दरोडाही टाकला.
निलंबित पीएसआयने वडिलांनाही दरोडा टाकण्यासाठी आणलं
या गुन्ह्यात निलंबित पीएसआय शंकर जासक याला त्याचे वडील रमेश जासक यानेही त्यांना मदत केली. शंकर आपल्या वडिलांना बाईकवर घेऊन आला होता. दरोडा टाकल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना जळगाव जिल्ह्यातील मन्यारखेडा गावात सोडलं होतं. तर तो मुद्देमाल घेऊन रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पसार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
दरोड्याची घटना नेमकी कशी घडली?
संबंधित दरोड्याची घटना ही गुरुवारी (1 जून) घडली होती. आरोपी हातात धारदार चॉपरसारखे चाकू घेऊन बँकेत शिरले होते. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांवर दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी बँकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं होतं. त्यांनी बँकेतील मोठा मुद्देमाल लुटून नेला होता. विशेष म्हणजे बँक मॅनेजरच्याच दुचाकीवरुन ते पसार झाले होते. अवघ्या 15 मिनिटात त्यांनी हे सगळं कृत्य केलं होतं.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?
आरोपी दरोडेखोर पळून गेल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन लावून माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बँकेतील आणि बँकेच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी तपासाची गती वाढवली. या दरम्यान पोलिसांना अयोध्या नगर येथे नाल्यात चॉपर, हेल्मेट, बँकेतून चोरलेला डीव्हीआर, बँक कर्मचाऱ्यांचे लांबवलेले मोबाईल सापडले. पोलिसांनी सर्व वस्तू फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे दिले होते. त्यानंतर पोलीस त्या मार्गाने तपास करु लागले आणि दरोड्याचा फास बँकेच्या शिपाईपर्यंत जावून पोहोचला. नंतर पोलिसांना सर्व घटना उलगडता आली.
पीएसआयला सेवेतून बडतर्फ
विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पीएसआय शंकर जासक 2019 मध्ये एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. तो लाच घेताना पकडला गेला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. संबंधित घटनेनंतर वर्षभर तो सेवेत नव्हता. नंतर तो काही काळ सेवेतही होता. पण गेल्या काही महिन्यांपासून रजेवर होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचं आता इतकं भयानक कृत्य उघड झाल्यानंतर त्याला थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. संबंधित कारवाई ही डीजीपींनी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे.
आरोपींकडून 70 हजारांचा खर्च, बाकी मुद्देमाल हस्तगत
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी 17 लाख रोकड आणि 3 कोटी 60 लाखांचे सोने हस्तगत केले आहेत. आरोपींनी लुटलेल्या मुद्देमालापैकी 70 हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.