Chandrapur APMC Election Result 2023: चंद्रपूर बाजार समितीत भाजप-काँग्रेस युतीचा विजय; दिनेश चोखारे गटाचा पराभव

 
Chandrapur APMC Election Result 2023: चंद्रपूर बाजार समितीत भाजप-काँग्रेस युतीचा विजय दिनेश चोखारे गटाचा पराभव
चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप- काँग्रेस या अनोख्या युतीचा विजय झाला तर, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर समर्थित माजी सभापती दिनेश चोखारे गटाचा पराभव झाला आहे. एकूण १८ संचालक असलेल्या या बाजार समितीत भाजप-काँग्रेस युतीचे १२ तर काँग्रेस चोखारे गटाचे ६ संचालक विजयी झाले आहे.
चंद्रपूर बाजार समितीची निवडणूक अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या चर्चेचे कारणही तसेच आहे. देशात आजवर कुठेही झाली नाही, अशी भाजप-काँग्रेसची युती या बाजार समितीच्या निवडणुकीत बघायला मिळाली. यामध्ये भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तथा माजी खासदार नरेश पुगलिया गटाचे संचालक एकत्र आले होते. भाजप व काँग्रेस युतीला आजी-माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद होताच. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढल्या जात नाही, असा युक्तिवाद भाजप व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून केला जात असला तरी एकत्र बैठका घेत निवडणूक प्रचाराची यंत्रणाही एकत्रीतरित्या राबवण्यात आली. त्याचा परिणाम भाजप-काँग्रेस युतीचे एकूण १२ संचालक विजयी झाले तर काँग्रेसच्या दिनेश चोखारे गटाचे सहा संचालक विजयी झाले. विशेष म्हणजे, चोखारे यांना काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा आशीर्वाद होता. तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व कृऊबाचे माजी सभापती मनोहर पाऊणकर यांची साथ होती. सलग पाच वर्ष सभापतीपद भूषविल्यानंतरही चोखारे यांना येथे नाराजीमुळे पराभवाचा फटका बसला. चोखारे गटातून स्वत: दिनेश चोखारे व युवा कार्यकर्ते अजय बलकी निवडून आले आहेत.