बाजारात मे अखेरीस कापूस आवक वाढणार
लहान शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली असली तरी मध्यम आणि मोठ्या कापूस उत्पादकांकडील साठा कायम आहे. एप्रिल-मे पर्यंत यातील बहुतांशी साठा बाजारात येण्याची शक्यता आहे. दहा टक्के साठ्याची विक्री पुढील हंगामात होईल, असे कापूस क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे .चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन घटले. तसेच गेल्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापसाची आवक जास्त राहिल्याने दर दबावात आले.
मागील तीन दिवसांमध्ये कापूस दर वाढले. पुढील काळातही कापूस सुधारू शकतात अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशात यंदाही कापसाचे उत्पादन कमीच राहील, हे जवळपास ऑक्टोबरमध्येच स्पष्ट झाले होते. शेतकरी उत्पादकता कमी आल्याचे सांगत होते. पण उद्योगांनी याच काळात विक्रमी उत्पादनाची टिमकी वाजवली. त्यामुळे बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न झाला.
पण मागील हंगामात कापसाचा तुटवडा होता. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ हजारांपर्यंत दर पाहायला मिळाले.
२८ फेब्रुवारीपर्यंत त्यातील १५५ लाख गाठींची आवक नोंदविण्यात आली. दरवर्षी फेब्रुवारीपर्यंत ७५ टक्के कापसाची आवक होते. यंदा मात्र हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले. त्यामागे दरवाढीची अपेक्षा हे कारण सांगितले जाते.
या वर्षी कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने भारतात कापूस लागवड दहा ते पंधरा टक्के कमी होण्याचा अंदाज असून, अमेरिकेत सुद्धा कापसाखालील क्षेत्र १५ ते २० टक्क्यांनी घटण्याचे संकेत आहेत. भारतीय बाजारात १५ मे पर्यंत कापसाची चांगली आवक होण्याचा अंदाज आहे.