Crorepati CM : या मुख्यमंत्र्याची संपत्ती अवघी 15 लाख! इतरांच्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे होतील पांढरे
नवी दिल्ली : जगात अनेक क्षेत्रात मोठे बदल झाले आहे. पूर्वी राजकारणात थोडीच मंडळी जात. समाजसेवेच भूत ज्याच्या मानगुटीवर असायचे ती लोक राजकारणात जात. राजकीय क्षेत्रात (Political Sector) पण बदलाची नांदी आली. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीतील खर्चाचे आकडे तुम्हाला घाबरवल्याशिवाय राहणार नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या संपत्तीचे आकडे पण असेच धक्का देणारे आहेत. देशातील खासदार (MP) आणि आमदारांच्या (MLA) संपत्तीने दिन दुगनी, रात चौगुनी प्रगती साधली आहे. निवडणूक शपथपत्रात हे आकडे आपल्याला पाहता येतात. देशातील राजकीय पुढारी आता श्रीमंत झाला आहे. अनेक उद्योजकांना जे जमले नाही, ते या राजकीय उद्योगाने साधता आले आहे. आता भारतातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची (CM Net Worth) आकडेवारीच पाहा ना, तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत..
काय आहे ADRचा दावा
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने (ADR) याविषयीची आकडेवारी समोर आणली आहे. या संस्थेने देशातील मुख्यमंत्र्याकडे किती संपत्ती आहे, याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री करोडपती आहेत. त्यांच्या संपत्तीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. यापैकी केवळ एका मुख्यमंत्र्याकडे अवघी 15 लाख रुपयांची संपत्ती असल्याचा दावा एडीआरने केला आहे.
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री 
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या दाव्यानुसार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर एडीआरच्या मते सर्वात कमी संपत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे. बॅनर्जी या केवळ 15 लाख रुपये संपत्तीच्या मालकीण आहेत. एडीआर आणि इलेक्शन वॉच (न्यू) यांच्यानुसार, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सर्व 30 सीएमच्या शपथपत्राआधारे संपत्तीची ही आकडेवारी समोर आणण्यात आली आहे.
याठिकाणी मुख्यमंत्री नाहीत
देशातील 28 राज्यांमध्ये सध्या मुख्यमंत्री आहेत. देशातील दोन केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि पुद्दुचेरीमध्ये मुख्यमंत्री आहेत. तर केंद्र शासित प्रदेश जम्मु आणि काश्मीरकडे सध्या मुख्यमंत्री नाहीत. एडीआरनुसार, देशातील 30 सीएमपैकी 29 (97 टक्के) त्यांची सरासरी संपत्ती 33.96 कोटी रुपये आहे.
43 टक्के मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्हे
एडीआरच्या अहवालानुसार, देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 (43 टक्के) वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शपथपत्रानुसार, त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि धमकी देणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील काही गु्न्ह्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कारावासाची तरतूद आहे.
कोणाकडे आहे सर्वाधिक संपत्ती
सर्वाधिक संपत्तीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी सर्वात आघाडीवर आहेत
त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 510 कोटींची संपत्ती आहे
अरुणाचल प्रदेशाचे सीएम पेमा खांडू यांच्या त्यानंतर या यादीत दुसरा क्रमांक लागतो
खांडू यांच्याकडे शपथपत्रानुसार, 163 कोटी रुपयांची संपत्ती आहे
या यादीत तिसऱ्या स्थानी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे आहेत
ओडिशा हे देशातील गरिब राज्य आहे. पटनायक यांच्याकडे आजघडीला 63 कोटींची संपत्ती आहे
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि हरियाणाचे सीएम मनोहर लाल खट्टर एक कोटींचे मालक आहेत
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांच्याकडे 3 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे