देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा! राज्यातील मुलींची चिंता फडणवीस करणार, माजी सहकार मंत्र्याचं अजब वक्तव्य
सोलापूर : भाजपचं धोरण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची स्तुती करताना एका भाजप आमदाराने केलेलं अजब वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण, लग्नापर्यंतची काळजी घेतली जात आहे. राज्यातील मुलींची चिंता आता फडणवीस करणार आहेत, असं वक्तव्य या आमदाराने केलंय. सोलापुरातील एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी भाषणादरम्यान हे वक्तव्य केलं. यंदाच्या अर्थसंकल्पात शिंदे-भाजप युतीने महिलांना विशेष सवलती दिल्या आहेत. याचीच स्तुती करताना सुभाष देशमुख यांनी हे अजब वक्तव्य केलंय. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उदघाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्य सरकारच्या धोरणांची स्तुती करताना सुभाष देशमुख यांनी हे अजब वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले?
विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस यंदा महिलांवर प्रचंड फिदा झालेत. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण, लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहित नाहीत, काय या वेळेस महिलांवर फिदा झालेत आहेत साहेब. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले आहे. मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. त्यानंतर पाचवी-सहावीला गेल्यावर पाच ते सहा हजार रुपये त्याच्या खात्यात जमा होतील. मुलगी शाहणी झाल्यावर पैसे.. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील…
मुलींची चिंता आता अर्थमत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. राज्यातील महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूरच्या बचत गटांच्या उत्पादनांना चांगले दिवस येतील, असं सुभाष देशमुख म्हणाले.