Farmer News: शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची प्रतीक्षा; अठराशे शेतकऱ्यांनी केले अर्जi
छत्रपती संभाजीनगर : कांद्याला चांगला भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल साडे तिनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. यासाठी अर्जही मागविले. त्याची छाननी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची पुर्तता करून अर्ज परत पाठविले. तरीही सरकारतर्फे या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही. यामुळे खरीप पेरणीच्या तोंडावर पैसे मिळतील ही शेतकऱ्याची अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख एकरच्या आसपास कांद्याचे लागवड क्षेत्र आहे. त्यातील एक लाख एकरपर्यंतचे क्षेत्र एकट्या वैजापूर तालुक्यात आहे. रब्बी व खरीप, अशा दोन्ही हंगामाचे हे क्षेत्र आहे. कांदा अनुदानासाठी जिल्ह्यातील नऊपैकी पाच बाजार समितीकडे कांदा अनुदानासाठी एकूण १२ हजार ३६६ शेतकऱ्यांचे अर्ज आले असून त्यापैकी सहा हजार ४७१ अर्जांची छाननी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली. अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त वैजापूरमधूनच आहे. वैजापूरमधून ५ हजार ५५१ शेतकऱ्यांचे अर्ज तेथील बाजार समितीकडे प्राप्त झाले आहेत. त्यातून २ हजार ५० अर्जांची छाननी झाली आहे. तर लासूर स्टेशन बाजार समितीकडे तीन हजार ९९४ अर्ज आले असून त्यातील १ हजार ८९० अर्जांची छाननी झाली आहे.
दरम्यान, राज्यात कांद्याचे दर गडगडले आहेत. कांद्याला शंभर ते सहाशे रुपये क्विंटलमागे दर मिळत आहे. साठवून ठेवणेही शेतकऱ्यांना परवडण्याची परिस्थिती नाही. सध्या मजूर, मशागतीसाठी ट्रॅक्टरला पैसा द्यावा लागत असून पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे छदामही नाही. उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मिळाले तर पेरणीच्या तोंडावर मदत होईल, असे शेतकरी शरद हाके यांनी सांगितले.