शेतकऱ्यांनो आपला शेतमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवा
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे दर ठरविले आहेत. हे दर अत्यंत कमी आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमाल घरात ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास अत्यल्प भाड्यात म्हणजेच सुमारे ७ रुपये प्रति महिना प्रति पोते इतक्या कमी भाड्यात संपूर्ण शेतीमालाचा सांभाळ, विमा संरक्षण, उंदीर, किडे, मुंग्या व बुरशी पासून संरक्षण करण्यात येते.
तसेच शेतकऱ्यांनी शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास ५० टक्के गोदाम भाड्यात सूट मिळते. शेतकरी कंपनी असल्यास गोदाम भाड्यात २५ टक्के सूट मिळते. त्यानुसार गोदाम भाड्याचा हिशेब केल्यास सुमारे ४ ते ५ रुपये मासिक भाड्यात शेतीमालाचे संरक्षण होऊ शकते.
यात सर्व खर्च जसे की संपूर्ण शेतीमालाचा सांभाळ, विमा संरक्षण, उंदीर, किडे, मुंग्या व बुरशीपासून संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. इतक्या कमी खर्चात जर आपल्या धान्याचे महिनाभर संरक्षण होत असेल तर शेतकऱ्यांनी ही संधी सोडू नये.