शेतकऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतके उत्पन्न मिळावे
Sangli News : खेड्यातील नागरिकांनाही जगता आले पाहिजे, अशी धोरणे सरकारने राबण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतका त्यांच्या शेतीमालातून उतन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, सर्व शेतीमाल नियंत्रणमुक्त करा, उसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव द्या, या प्रमुख मागण्यांसाठी कसबेडिग्रज (ता. मिरज) येथे ५३ वी जनजागृती सभा झाली.
पुणे जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर ऊस पाचटाची कुट्टी
या वेळी आष्टा येथे मंगळवारी (ता. २३) ऊस परिषदेचे आयोजन केले असून शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माने यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी यशवंत कदम होते. या वेळी शरद जोशी संघटनेचे, उदय पाटील, शितल कांबळे, नारायणराव चव्हाण, सर्जेराव घाटगे, शिवाजी नलवडे, वसंत परमाने, धनपाल गळतगे उपस्थित होते.
शिवाजी माने म्हणाले, देशात श्रीमंत आणि गरीब अशी दरी वाढत आहे. भांडवलदार, व्यावसायिक, निर्यातदार, आणि उद्योगपती यांच्या बाजूनेच कायदा आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण अशी दरी रुंदावत आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे कायदेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या शेतीमालाला दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, सर्व शेतीमाल नियंत्रणमुक्त करा आणि उसाला प्रति टन पाच हजार रुपये, आपल्या उत्पादित मालाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळावा या मागण्या घेऊन गावोगावी जाऊन जगजागृती सुरू केली आहे.
आष्टा येथे २३ मे रोजी होणाऱ्या ऊस दर परिषदेसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. उदय पाटील, शितल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.