त्या दंगल प्रकरणात माजी आमदारासह 18 जणांना सक्तमजुरी - काय घडलं होतं नेमकं प्रकरण
नांदेड : नांदेडमध्ये 2008 साली महागाई विरोधात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या तत्कालीन आमदारांसह एकूण 19 जणांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी 19 जणांना प्रत्येकी 5 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. आंदोलन कर्त्यांनी 8 एसटी बसेस आणि एका महापालिकेच्या बसची तोडफोड केली होती. या प्रकरणी अतिरिक्त न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी हा निकाल दिला आहे.महागाई विरोधात केले होते आंदोलन शिवसेनेच्या आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली 7 जून 2008 रोजी महागाई विरोधात हिंगोली गेट परिसरात रास्ता रोको आंदोलन केले होते.
या आंदोलनात जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, भुजंग पाटील यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारीही सहभागी झाले होते. या दरम्यान महापालिका आणि पोलिसांच्या दोन वाहनांसह 4 एसटी बसेसवर दगडफेकदेखील करण्यात आली होती. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱी जखमी झाले होते.
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तब्बल पंधरा वर्षे नांदेडच्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यामध्ये चार जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अखेर 15 वर्षानंतर न्यायाधीश बांगर यांनी माजी आमदारांसह 19 जणांना 5 वर्षे कारावास आणि एक लाख साठ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या वाहनांचे झालेले नुकसान
लातूर एस.टी.आगाराची बस (एम.एच.20 डी. 8827) घेवून चालक हवगीराव शिवमुर्ती टिपराळे हे 7 जून 2008 रोजी सकाळी 6.45 वाजता नांदेडला पोहचले होते.त्यांची बस हिंगोली गेटच्या खुराणा ट्रॅव्हलसमोर आली असता रस्त्यावर आंध्र प्रदेशची एसटी गाडी क्रमांक (ए.पी. 28 झेड. 2316) यातील प्रवाशी खाली उतरून पळतांना दिसत होते.
त्याचवेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी हातात दगड, काठ्या, लाठ्या, गजाळ्या घेऊन बेकायदेशीर पणे सरकारी मालमत्तेचे नुकसान करत होते. हवगीराम टिपराळे यांनी दिलेल्या तक्रारीत एकूण 5 नावे होती आणि इतर 20 ते 22 शिवसैनिक असा उल्लेख होता. त्यामुळेच याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक व्ही. एच. सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला होता. त्या दिवशी एसटी गाडी (क्रमांक एम.एच.20 डी.5917), (एम.एच.20 डी.7348), (एम.एच.20 डी. 6812), (एम.एच.40-9623), (एम. एच. 40-8125), (एम.एच.20 डी. 5173) तसेच महानगरपालिकेची चार चाकी वाहन क्रमांक (एम.एच. 26 बी.445) तसेच पोलीस गाडी क्रमांक (एम.एच.26 एल.273) या वाहनाचे नुकसान केले होते. तर पोलीस अंमलदारांना, पोलीस अधिकाऱ्यांना दगडफेकीत मारही लागला होता.
शिक्षा झालेले आरोपी
माजी आमदार अनुसयाबाई खेडकर, त्यांचे पुत्र महेश खेडकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सह संपर्क प्रमुख भुजंग पाटील, नऱहरी वाघ, बालाजी शिंदे, नवनाथ भारती, माजी पंचायत समिती सभापती व्यंकोबा रोगडे, भुजंग कावळे, बाळगीर गिरी, दौलत पोकळे, बाळू तिडके, शिवाजी सूर्यवंशी, श्रीकांत पाठक, सुभाष शिंदे, भैया शर्मा यांच्या सह सेनेतून भाजपात गेलेले दिलीप ठाकूर, संदीप छपरवार, मनोज यादव आदिना ही शिक्षा सुनावण्यात आलीय.
उग्र आंदोलन करणाऱ्यांना धडा
राजकीय पक्षांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची आजच्या या निकालानंतर डोळे उघडले आहेत. चमकोगीरी करत पक्षात नाव उंचावण्यासाठी शासकीय मालमत्तेचे नुकसान करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा काहींचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र आजच्या निकालाने अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे पाणावलेले दिसले.
शिंदे गटात विभागल्या गेलेले कार्यकर्ते देखील ठाकरे गटाच्या या शिक्षा झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी न्यायालय परिसरात आले होते. त्यावेळी आता असले आंदोलन नको अशी चर्चा रंगली होती.