ऊस मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा
ऊस मुकादमांकडून सातत्याने होणाऱ्या फसवणुकीमुळे अनेक ऊस वाहतूक करणारे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी होत असल्याने पोलिस महानिरीक्षकांनी त्याची दखल घेतली आहे. फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कायदेशीर करावाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे फसवणुकीवर आळा बसून ऊस वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजूर पुरवठा करताना मुकादमांकडून मोठी आर्थिक फसवणूक होते. दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा या मुकादमांकडून घालण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.मुकादम वाहनधारकाकडून ऊस तोडणीसाठी मजूर पुरविण्याकरिता १० ते १५ लाख रुपयांचा आगाऊ रक्कम घेतात. हे मुकादम एका टोळीसाठी तीन ते चार वाहनधारकांकडून अशी रक्कम घेऊन फक्त एकाच वाहनधारकास मजूर पुरवितात. यामुळे उर्वरित वाहनधारकांची फसवणूक होते. त्यांचे पैसे अडकून बसतात. मुकादम पैसे न देता पसार होतात. त्यामुळे अनेक ट्रॅक्टरधारक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अनेकांना ट्रॅक्टर विकावे लागले आहेत. वाहनधारक शेतकऱ्यांना शेतजमीनही विकावी लागत आहे. राज्यातील हजारो वाहनधारक या फसवणुकीचे बळी पडले आहेत. अनेक वाहनधारकांनी संबधित मुकादमांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई न होता उलट वाहनधारकांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे प्रकार घडले आहेत.
दरम्यान, हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन पोलिस महासंचालक कार्यालाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे. या आदेशानुसार पोलिस घटक प्रमुखांनी ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून फसवणुक व त्या अनुषंगाने इतर प्रकार, घटना निदर्शनास आल्यास, संबंधितांवर योग्य कारवाई करावी. सर्व पोलिस ठाणे प्रमुख, शाखा प्रमुख यांना सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, असे म्हटले आहे.