जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा, बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत नेमकं काय घडलं?
जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon APMC) सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. शामकांत सोनवणे यांनी महाविकास आघाडीच्या संचालकांसोबतच भाजप आणि शिंदे गटाच्या संचालकांची मदत घेऊन सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. सभापतीपदी निवडून आलेले शामकांत सोनवणे यांना 18 पैकी 15 मते मिळाली.
सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून श्यामकांत सोनवणे यांच्या सोबतच महाविकास आघाडीचे संचालक लक्ष्मण पाटील हे देखील इच्छुक होते. मात्र, आपल्याला शामकांत सोनवणे यांच्यासह इतर काही संचालकांनी दबाव आणून माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण पाटील यांनी केलाय.
या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये बेबनाव दिसून आला. भाजप आणि शिंदे गटाने खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापतीपदी विराजमान केल्याचंही बोलले जात आहे. विशेष म्हणजे या दरम्यानच्या काळात आपल्या समर्थकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप लक्ष्मण पाटील यांनी केला.
मी मविआचा अधिकृत उमेदवार’
दरम्यान, सभापतीपदी निवडून आलेले शामकांत सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मला मविआ नेते गुलाबराव देवकर आप्पा यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. मी अर्ज दाखल केला. तसेच आमच्यातल्या एकानेही अर्ज भरला तो डमी होता. मला सगळ्यांनी मदत केली. त्यामुळे मी विजयी झालो”, असं शामकांत सोनवणे यांनी सांगितलं.
“लक्ष्मण गंगाराम पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिलेली नव्हती. उलट त्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली. नेमका वाद झाला ते मला माहिती नाही. मी अँटीचेंबरमध्ये नव्हतो. मी तेव्हा सभागृहात होतो. मी लक्ष्मण पाटील यांच्यापर्यंत गेलोच नाही तर मारहाणीचा विषयच येत नाही”, अशी प्रतिक्रिया शामकांत सोनवणे यांनी दिली.
लक्ष्मण पाटील यांचा मारहाण झाल्याचा आरोप
“मी ठरल्याप्रमाणे अर्ज भरायला गेलो. एकतर आधीच गोकूळ चव्हाण यांनी अर्ज घेतला. त्याचा अर्ज फेकून दिला. या मुलाच्या कानशीलात लागवली. मारहाण केली. अरुन डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. तुमच्या कॅमेऱ्यात हे सगळं कैद झालंय. असं काय, हे कोणतं राजकारण आहे? ही लोकशाही आहे की हुकूमशाही आहे? या हुकूमशाहीच्या हिशोबाने आमच्यासारख्याने जगायचं नाही का?”, असा सवाल लक्ष्मण पाटील यांनी केला.
हे मतदान रद्द झालं पाहिजे आणि पुन्हा मतदानाची तारीख जाहीर झाली पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण पाटील यांनी केली. तसेच शामकांत बळीकाम सोनवणे आणि दिलीप पाटील या दोघांना हात उचलले. व्हिडीओ आलं आहे. पोलीसही उभे होते, असंही लक्ष्मण पाटील यावेळी म्हणाले.