नांदेडमध्ये हळदीची एकाच दिवशी सर्वाधिक आवक
Nanded Apmc नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गतच्या नवा मोंढा बाजारात सोमवारी हळदीची आवक वाढली. एकाच दिवशी तब्बल पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक हळदीची आवक झाली. त्यास सरासरी ५९०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील वर्षीही हळदीची मोठी लागवड या भागात झाली होती. परंतु अतिवृष्टीमुळे कंदसड लागून उत्पादनात घट येत आहे. शेतकरी नांदेड बाजार समितीमधील नवा मोंढा बाजार तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजारात हळद विक्रीसाठी आणतात.
हिंगोलीत हळदीच्या आवकेत गतवर्षीपेक्षा १२ हजार क्विंटलने वाढ
नवीन हळदीची आवक सुरु झाल्यानंतर नांदेड बाजारात सोमवारी (ता. २३) सर्वाधिक आवक झाली. एकाच दिवशी जवळपास दहा हजारापेक्षा अधिक हळदीचे कट्टे म्हणजेच पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक हळद शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणली. ही आवक मागील काही दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
सोयाबीनला ४४८० रुपये दर
दरम्यान, हळदीला प्रतिक्विंटल कमाल ६५००, किमान ५२०० तर सरासरी ५९०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे कर्मचारी रवी कल्याणकर यांनी दिली.
यासोबतच बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल कमाल ४९२०, किमान ४४०० तर सरासरी ४४८० रुपये दर मिळाला. हरभरा कमाल ४५५५, किमान ४४०० तर सरासरी ४४८० रुपये, तर गव्हाला कमाल २४५०, किमान २१०० तर सरासरी २४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.