पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७१३ जनावरांनी जीव गमवला
बीड: नैसर्गिक आप्पती मध्ये मानव जात कितपत दोषी आहे ?? वीज पडणं , पूर येण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त विविध कारणांनी मानव व प्राणी आपला जीव गमावत असतात.   मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत वीज पडून, पुरात वाहून, इतर नैसर्गिक आपत्तीने पाच वर्षांत ५६१ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. शिवाय ६ हजार ७१३ जनावरांनाही आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. आपत्ती ही सांगून येत नाही, हे अनेकदा अधोरेखित होते. नैसर्गिक आपत्तीने जीवितहानी होऊ नये यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावरून उपाययोजना आखल्या जातात. परंतु तरीही नैसर्गिक आपत्तीत जाणारे बळी लक्षात घेता या उपायोजनांमध्ये आधुनिकता येणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट होते आहे. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५६१ व्यक्ती व ६७१३ जनावरांचा विविध नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या ५६१ व्यक्तींमध्ये अंगावर वीज पडून २९४, पुरात वाहून गेल्याने २३२, तर इतर नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या ३५ व्यक्तींचा समावेश आहे.दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या ६ हजार ७१३ जनावरांमध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या ३ हजार १४७ जनावरांसह पुरात वाहून गेलेला ३ हजार २१३ व इतर नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या ३५३ जनावरांचा समावेश आहे. सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीचे मृत्यू २०२१ मध्ये झाले आहेत. दुसरीकडे उन्हाळा असूनही वादळ वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसादरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीने अलीकडच्या चार महिन्यांतील व्यक्ती व जनावरांची मृत्यू संख्या उपाययोजनांबाबत चिंता वाढवणारी आहे.