नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी उद्धघाटन, विरोधात आहेत 19 पक्ष, परंतु समर्थनार्थ आले जास्त पक्ष
नवी दिल्ली : येत्या रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वात आधी विरोध केला. त्यांनी ट्विट करत हा विरोध केला. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे, असे ट्विट केले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. मग राहुल गांधी यांच्यासोबत देशातील १९ पक्ष आले. परंतु आता उद्घघाटन दोन दिवसांवर आले असताना सरकाराला दिलासा देणारी बातमी आहे. सरकारच्या समर्थनार्थ २५ पक्ष आले आहे.
किती जणांचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या समारंभास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदनही काढले आहे. परंतु आता सरकारच्या समर्थनार्थ 25 पक्ष आले आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये फुट पडली आहे. हे सर्व पक्ष उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहे. यामध्ये एनडीएमधील पक्षांसोबत इतर पक्षही आहेत.
हे पक्ष होणार सहभागी
ओडिशाचा बिजू जनता दल, आंध्रचा वायएसआर काँग्रेस, पंजाबचा शिरोमणी अकाली दल, मायवती यांची बहुजन पार्टी या पक्षांनी भाजप आणि विरोधी आघाडीपासून ‘समान अंतर’ ठेवून संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आपली उपस्थिती जाहीर केली आहे. नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी, सुखबीर बादल यांच्या या निर्णयामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला नक्कीच दिलासा मिळणार आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या पक्ष एनपीपीने रविवारी आपला प्रतिनिधी पाठवण्याची घोषणा केली आहे.
हे येऊ शकतात
आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसप्रमाणेच प्रमुख विरोधी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) देखील एनडीएचा सदस्य नसतानाही सरकारच्या कार्यक्रमात सामील होत आहे. TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. रामविलास पासवान यांचा मुलगा खासदार चिराग हे ही रविवारी सेंट्रल व्हिस्टाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. त्यांनी अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही.
भाजपच्या मित्रपक्षातील तीन केंद्रीय राज्यमंत्री पशुपती पारस यांचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष, रामदास अठवाल यांचा आरपीआयए, अनुप्रिया पटेल यांचा अपना दल (एस) संसदेच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची जेजेपी, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची एडीएमके, झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री सुदेश महतो येणार आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांचा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, नागालँडचे मुख्यमंत्री नीफियू रिओ यांचा एनडीपीपी, मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांचा मिझो नॅशनल फ्रंट, नागालँड पीपल्स पार्टी समारंभात सहभागी होणार आहे.