मका, हळद, तुरीच्या किमतींत वाढ
Apmc Commodity update : हळदीमधील तेजी कायम आहे. चालू वर्षी हळदीचे उत्पादन कमी झालेले आहे. पुढील वर्षीसुद्धा उत्पादन कमी असेल असा अंदाज आहे. हळदीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे हळदीच्या किमती चढ्या आहेत. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. हेजिंगसाठी सुद्धा खूप चांगली संधी आहे.
मक्याची मागणी वाढती आहे. कमी उत्पादनाच्या भीतीमुळे किमती वाढत आहेत. हरभरा व तूर यांच्या किमतीसुद्धा वाढत आहेत. चालू वर्षी देशातील तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे किमती वाढत आहेत. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावर व किमतीवर चालू खरिपात विशेष लक्ष ठेवणे जरूर आहे. SEBI ने २१ जुलैपासून हळदीवरील मार्जिन २ टक्क्यांनी वाढवले आहे.
या सप्ताहात तूर वगळता बहुतांश पिकांच्या किमती वाढल्या. यंदा जुन-जुलैमधील मुगाची आवक गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कांद्याची व टोमॅटोची आवक कमी होत आहे. त्यामुळे या सप्ताहातही किमती वाढल्या आहेत. मक्याचे भाव वाढत आहेत. हळदीच्या भावात १३.२ टक्क्यांनी वाढ झाली.