Kalyan Apmc Election: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा

Kalyan Apmc Election: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार कल्याण बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करण्याची मुदत आहे. निवडणुकीसाठी व्यापारी, अडते, ग्रामपंचायत, सेवा संस्थांचे प्रतिनिधी मतदार असतील. या सर्वांचे मतदार यादीकडे लक्ष लागले आहे.
कल्याण बाजार समितीची निवडणूक १७ मार्च २०१९ झाली. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ मार्च २०२४ मध्येच संपला मात्र शासनाने मुदतवाढ दिल्याने एक वर्ष निवडणूक लांबणीवर पडली मात्र आता राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार १७ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदारयादी जिल्हा उपनिबंधक यांना सादर करावी लागणार आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पणन संचालक विकास रसाळ यांनी कल्याण बाजार समितीवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांची नियुक्ती केली होती मात्र आठच दिवसांत प्रशासकीय राजवट उठवली. यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची गरज होती मात्र सभापती निवडणूक घेण्यात आली. यानंतर भाजपचे दत्तात्रय गायकवाड सभापती झाले. त्यांना सभापती म्हणून अवघा तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
२० फेब्रुवारीची अंतिम मुदत
पात्र व्यापारी, अडते यांची मतदारयादी तयार करण्याची जबाबदारी बाजार समितीच्या सचिवांची आहे. ग्रामपंचायत सदस्यांची यादी पंचायत समितीचे बीडीओ करणार आहेत. तर सेवा संस्थांच्या प्रतिनिधींची यादी तालुका उपनिबंधक करणार आहेत. या सर्वांनी १७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रारूप मतदारयादी पाठवायची आहे. यानंतर हरकत, सूचनांसाठी ती प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम तयार करून जिल्हा उपनिबंधक ती जाहीर करणार आहेत. यासंदर्भात उपनिबंधक शांताराम चव्हाण यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार याद्या सादर करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम जाहीर होईल.