माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत
पुणे: माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.रमाकांत ऊर्फ बबलू राजेंद्र जोगदंड (वय ३०, रा. वाकड), समीर ऊर्फ बबलू नझीर शेख (वय ३३, रा. काळेवाडी), मयूर बाळासाहेब सरोदे (वय २३) आणि करण सदाफळ चव्हाण (वय २४, दोघेही रा. पुनावळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिकेत रवींद्र वाडिया (वय २४, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपी जोगदंड आणि त्यांच्या साथीदारांनी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असून, माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे ठेवले, कसे काम करत आहात असे म्हणत फिर्यादी अनिकेत याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घड्याळ, अंगठी जबदरस्तीने काढून नेली. आरोपी जोगदंड, शेख हे दोघे वाशी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक केले. आरोपी जोगदंड हा सराईत असून, माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहे. दुसऱ्या एका कारवाईत सुरेश बाबूराव बनसोडे (वय ३७, रा. रहाटणी) याला अटक केली आहे. त्याने दहा हजारांची खंडणी मागत ट्रकची काच फोडली होती. तो माथाडी जनरल कामगार युनियन ट्रान्सपोर्टचा पिंपरी-चिंचवड सचिव असल्याचे सांगत लूटमार करत होता.