बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न? बंडखोरीची होईल का लागण
महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय ड्रामाचे (NCP Crisis) पडसाद देशभरात उमटले. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात विरोधी पक्षातील नेते एकजूट झाले. बिहारमधील पाटण्यात त्यांनी मोदीविरोधात रणशिंग फुंकले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना विरोधी खेम्याचे नेतृत्व देण्याचे स्पष्ट संकेत दिले. बिहारमधून भाजपविरोधात विरोधकांनी रणशिंग फुकल्यानंतर लगेचच भाजपने महाराष्ट्रात ट्रेलर दाखवला. विरोधकांना मोठा झटका दिला. आता दस्तूरखुद्द नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या गडात सुरुंग पेरल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढचा चित्रपट भाजपा बिहारमध्ये दाखवले, असा चर्चांना ऊत आला आहे. काय शिजतंय चाणक्यच्या प्रदेशात..
बंडाची चाचपणी
सध्या सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात पुढचा भूकंप बिहारमध्ये होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राजकीय विश्लेषकापासून काही पुढाऱ्यांना पण हीच शक्यता वाटत आहे. जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या सरकारमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा सुरु झाला आहे. त्यामुळे पक्षातून कोण बंड करेल याची चाचपणी करण्यात येत आहे.
नितीश कुमार यांनी घेतली बैठक
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्रातील घडामोडींमुळे सतर्क झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या आमदार, खासदारांसोबत खास बैठक घेतली. त्यात समोरासमोर बोलणी केली. महाराष्ट्रातील घडामोडींचा धडा बिहारमध्ये गिरवू नये, यासाठी कवायत सुरु करण्यात आली आहे. आता विरोधी गटाने रणशिंगे फुटले. 2024 लोकसभा निवडणुकीची रणनीती सुरु असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला.
खासदारांशी चर्चा
नितीश कुमार यांनी 2 जुलैपासूनच निवासस्थानी खासदार आणि आमदारांच्या बैठकींचे सत्र सुरु केले आहे. नितीश कुमार यांनी खासदार चंदेश्वर प्रसाद चंद्रवंशी, दुरल चंद्र गोस्वामी, सुनील कुमार कुशवाहा आणि राज्यसभेचे खासदार अनिल हेगडे यांच्याशी चर्चा केली.
संख्याबळ इतके
बिहार विधानसभेच्या महाराष्ट्राखालोखाल 243 जागा आहेत. यापैकी 45 आमदार नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त या पक्षाचे आहेत. तर लोकसभेत जदयुचे एकूण 16, तर राज्यसभेत एकूण 5 खासदार आहेत. कोणते नेते भाजपच्या गळाला लागले आहेत, तिथे ऑपरेशन लोट्स कसे होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे. पण अनेक जण नितीश कुमार मात देतील, असा पण दावा करत आहेत. दरम्यान नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची पण भेट घेतली.
पक्ष वाचविण्याची धडपड
रालोजदचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी या घडामोडीपूर्वीच मोठा बॉम्ब टाकला. पहिली फूट जेडीयूमध्ये नाही तर काँग्रेस पक्षात पडेल, असा दावा त्यांनी केला. तसेच नितीश कुमार सध्या पक्ष वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनता दल संयुक्तचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात या बैठक सत्रावर तात्काळ जदयू कडून स्पष्टीकरण देण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमार केवळ समस्या आणि अडचणी जाणून घेत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.