साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक
दापोली: कोकणातील दापोली तालुक्यातील मुरूड येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कदम हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असतानाच आता तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीच्या ताब्यातून दापोली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुरुड येथील बहुचर्चित असलेल्या साई रीसाँर्ट प्रकरणी आता दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना काल (दिनांक ३० मार्च) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या देशपांडे यांचा मुक्काम दापोलीच्या सबजेल मध्ये आहे.
मुरुड येथील मालमत्ता धारक अनिल दत्तात्रय परब यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसताना २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुरुड ग्रामपंचायतीत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे भासवून मुरुड ग्रामपंचायतिची व पर्यायाने शासनाची फसवणूक केली. मुरुडचे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुरेश तुपे व तत्कालीन ग्रामसेवक अनंत कोळी यांनी अभिलेखाची नोंद करताना जागेवर प्रत्यक्ष जावून खातरजमा केली नाही.
त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल परब, सुरेश तुपे व अनंत कोळी यांच्या विरोधात दापोलीचे गटविकास अधिकारी रूपा दिघे यांनी दापोली पोलीस ठाण्यात ८ नोव्हेंबर २२ तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातून १९ नोव्हेंबर २२ रोजी अटकपूर्व जामीन घेतला होता. त्यानंतर याच प्रकरणात दापोली पोलिसांनी बुरोंडी मंडळाचे तत्कालीन मंडळ अधिकारी सुधीर शांताराम पारदुले यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना १५ मार्च २०२३ रोजी अटक केली होती. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. याच प्रकरणी आता साई रीसॉर्टला बिनशेती परवाना देणारे दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांनी इडी कोठडीतून या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यासाठी दापोली पोलीसानी देशपांडे यांच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी केल्यावर न्यायालयाने देशपांडे यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.