कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे.
मॉन्सून उशिराने दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी-अधिक आहे. पावसातील खंडामुळे खोळंबलेल्या पेरण्या सुरू होऊ लागल्या आहेत. धरणांच्या पाणलोटात मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे.
शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्याकडे पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता.
सध्या खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहे. या भागात ज्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तेथे पेरणीस सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. त्याचवेळी कोकण, मध्य महाराष्ट्रातही कमीअधिक पाऊस होता.