टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट
Unseasonal Rain update: अवकाळी पावसाने यंदा चांगलाच कहर केला असून, फळबाग उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असल्याने टोमॅटो बागेस फटका बसला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.शिरूर अनंतपाळ प्रकल्पाचा तालुका असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन भेंडी, मेथी, चवळी, दोडका, मटकी, काकडी, कोथिंबीर यासह टोमॅटोची लागवड करीत आहेत. यंदा टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. तीन महिन्यापुर्वी लागवड केलेले टोमॅटो ऐन लग्नसराईत काढणीस येतील आणि त्यातुन चार पैसे मिळतील असे वाटत असतानाच महिनाभराच्या कालावधीत तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा टोमॅटो बागेस फटका बसला असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत झाले आहेत. अनेकांच्या शेतात टोमॅटोचा सडा पडला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादनातुन मिळणारा फायदा तर मिळालाच नाही उलट लागवडीचा खर्च वाया गेला असल्याने शेतकरी मोठ्या सकंटात सापडले आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या कशा करायचे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.