ना बोनस, ना चुकारे केवळ आश्वासनाचे पोवाडे
ना बोनस, ना चुकारे केवळ आश्वासनाचे पोवाडे
मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरणार का? दोन महिने उलटूनही जीआर नाही
धान्य उत्पादक शेतकऱ्यांना   हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या घोषणेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील जीआर अद्याप निघालेला नाही. तर महिनाभरापासून धानाचे 600 कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ना बोनस, ना चुकारे केवळ आश्वासनाचे पोवाडे असं चित्र पाहायला मिळत आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला जातो. मात्र यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रतिक्विंटल बोनसऐवजी हेक्टरी 15 हजार रुपये बोनसची घोषणा केली.
शासनाने दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित केली. ही घोषणा करून आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला पण अद्यापही यासंदर्भात जीआर काढलेला नाही. त्यामुळे अद्यापही बोनस जमा करण्याची अथवा बोनससाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यासुद्धा निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाच त सहा लाखांवर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बोनसची घोषणा पोकळ आश्वासन ठरणार नाही ना अशी शंका आता शेतकरी घेऊ लागले आहेत.