कांदा करणार महाराष्ट्रातील राजकारणाचा वांदा?, महाराष्ट्र आणि तेलंगणात एवढी तफावत का?
औरंगाबाद : कांद्याचे भाव कमालीचे पडले. त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्यामुळे पाणी आलं. मात्र हेच डोळ्यातलं पाणी पुसण्याचे काम सध्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद हे शहर करत आहे. बीआरएस च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला कांदा हा हैदराबादला रवाना होतोय. महाराष्ट्रात ज्या कांद्याला 400 500 ते 700 रुपयांचा भाव मिळत होता. त्याच कांद्याला तेलंगणामध्ये 1900 रुपयाचा भाव मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. बीआरएस या पक्षाचे गुलाबी झेंडे लावलेले ट्रक कांदा तेलंगणात नेत आहेत. तेलंगणा राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून हैदराबादची ओळख आहे. याच हैदराबादमधल्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये हा कांदा विक्रीला जात आहे.
उद्या सकाळी विक्री झाल्यानंतर कळेल भाव
शेतकऱ्यांची अशी धारण आहे की हैदराबादच्या मार्केटमध्ये तब्बल 1900 रुपयाचा भावाने कांदा विकला जात आहे. खरं तर महाराष्ट्रातून निघालेल्या ट्रक दुपारी हैदराबादमध्ये पोहोचलेत. उद्या सकाळी या कांद्याची विक्री होईल. त्यावेळेला नेमका किती भाव मिळेल हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र हैदराबादच्या मार्केटमध्ये 1900 रुपयाचा भाव मिळत असल्याची चर्चा आहे.
राज्यात शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड वैजापूर आणि गंगापूर हे कांद्याचे हब म्हणून ओळखले जाणारे तालुके आहेत. या तालुक्यात दरवर्षी लाखो क्विंटल कांदा पिकवला जातो. मात्र यावर्षी अचानकच कांद्याचे भाव कमालीचे घसरले. कांद्याला फक्त शंभर रुपयाचा भाव मिळू लागला. त्यामधून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा अक्षरशा रस्त्यावर फेकून दिला. शेतकऱ्यांवर रडण्याचीच वेळ आली होती.
हर्षवर्धन जाधव यांनी घेतला पुढाकार
मात्र कन्नडचे माजी आमदार आणि सध्या बीआरएस या पक्षामध्ये सामील झालेले हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यातील कांदा हैदराबादला तेलंगणात विक्री करणार असल्याची घोषणा केली. त्याला प्रतिसाद म्हणून आत्तापर्यंत तीन ते चार ट्रक हैदराबादला रवाना सुद्धा झाले आहेत. हैदराबादच्या मार्केटमध्ये 1900 रुपये भाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सध्या हैदराबादकडे ओढा सुरू आहे. बीआरएस पक्षाचे झेंडे आणि बॅनर लावून शेकडो क्विंटल कांदा ट्रकमध्ये टाकून शेतकरी आपला कांदा तेलंगणाकडे घेऊन जात आहे.
महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य म्हटलं जातं. कृषीप्रधान राज्य म्हटलं जातं. मात्र याच राज्यात शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेजारचं अत्यंत छोटं आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा काही पटीने लहान असलेलं राज्य महाराष्ट्राच्या मदतीला आले.
राज्यातील राजकारणाचा वांदा होणार?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्य खरेदी करू लागले. खरं तर तेलंगणाचे मुख्यमंत्री हे चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पाय पसरू लागले आहेत. त्यातच महाराष्ट्रातील कळीचा प्रश्न असलेल्या कांद्याचा सुद्धा तेलंगणात प्रश्न सुटत आहे. सहाजीकच शेतकऱ्यांच्या मनात बीआरएस पक्षाबद्दल आपुलकी निर्माण होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या माध्यमातून के सी राव हे महाराष्ट्रातील राजकारणांचा वांदा तर करणार नाहीत ना, अशी चर्चा सुरू आहे.