PM Kisan Tractor Yojana 2023 : ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार अनुदान; अर्ज कुठे करायचा?
 
PM Kisan Tractor Yojana 2023 : ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार अनुदान अर्ज कुठे करायचा?
PM Kisan Tractor Scheme देशभरात काही दिवसांतच खरिप हंगाम (Kharif Season) सुरू होणार आहे. त्यामुळे शेतीच्या कामांसाठीची शेतकऱ्यांची आतापासूनच लगबग सुरू होईल. परंतु दिवसेंदिवस शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी मजूर टंचाईचा (Labor Shortage) सामना करावा लागत आहे.त्यातही शेतीकामांसाठी मजूर मिळाले तरी त्यांची मजूरी शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे आता बहुतांश शेतकरी कृषी यांत्रिकिकरणाचा (Agriculture Mechanization) आधार घेत आहेत.
कृषी यांत्रिकिकरणासाठी सरकारही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकार कृषी यांत्रिकिकरणाच्या अनेक योजना राबवत आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२३ ही सुध्दा यापैकीच एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या खरेदीवर अनुदान देत आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरस्कृत योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतात. देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीची २० टक्के इतके अनुदान मिळते.
योजनेसाठी पात्रता -
ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांना काही निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. या निकषांची पूर्तता केल्यानंतरच शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होवून अनुदानाचा लाभ मिळवू शकतात.
शेतकऱ्याने यापूर्वी कोणताही ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा.
शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.
ही योजना छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे.
या योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळू शकतो.
एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती योजनेसाठी अर्ज करू शकते.
या योजनेंतर्गत शेतकरी फक्त एक ट्रॅक्टर अनुदानासाठी पात्र आहे.
आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
उत्पन्नाचा दाखला
पॅन कार्ड
बँत पासबुक
ड्रायव्हींग लायसन्स (गाडी चालविण्याचा परवाना)
सातबारा
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो