Pomegranate Market : डाळिंबाच्या दरात यंदा सुधारणा
गेल्या तीन वर्षांपूवी नैसर्गिक संकट (Natural Calamity), पीन होल बोअरचा प्रादुर्भाव यामुळे डाळिंबाच्या क्षेत्रात घट झाली. परिणामी उत्पादन घटल्याने बाजारात डाळिंबाच्या आवकेत घट झाली. यामुळे डाळिंबाचे दर (Pomegranate Rate) १०० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत पोहोचले.
सध्या हस्त बहारातील डाळिंबाची काढणी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा डाळिंबाचे दर उच्चांकी असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या तीन वर्षांपासून डाळिंब शेतीवर नैसर्गिक आपत्तीचे संकट होते. त्यातच पीन होल बोअर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे डाळिंबाच्या बागा वाळून गेल्या. परिणामी राज्यातील डाळिंबाचे क्षेत्र कमी झाली.
पंरतु यंदाच्या मृग बहारापासून डाळिंबाला पोषक वातावरण होते. त्यामुळे डाळिंबाचा दर्जा चांगला राहिला. या हंगामातील डाळिंबाला प्रति किलोस १०० रुपयांपासून १५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला.
यंदा राज्यात हस्त बहारातील डाळिंबाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर होते. छाटणीपासून ते आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती, परतीचा पाऊस फारसा झाला नाही.
तसेच डिसेंबरमध्येही मॉन्सूनोत्तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे डाळिंबाचे पीक चांगले फुलू लागले.
दरम्यान, फुलकळीच्या टप्प्यात वातावरणातील बदलाचा परिणाम पिकावर झाला. त्यामुळे फुल सेटिंग होण्यास अडचणी आल्या. परंतु त्यानंतर डाळिंबाला पोषक असे वातावरण होते. त्यामुळे दर्जेदार डाळिंब शेतकऱ्याच्या हाती आले.
राज्यातील हस्त बहारातील डाळिंबाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाची आवक झाली असून हंगामाच्या प्रारंभापासून डाळिंबाचे दर प्रति किलोस १०० ते १२० रुपयांच्या पुढे होते.
हंगाम संपत आला असला तरी डाळिंबाच्या दरात मंदी आली नसल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दुबई आणि बांगलादेश या देशात डाळिंबाची निर्यातही झाली आहे. यंदाच्या हंगामात निसर्गानेही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना साथ दिली असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी दर
राज्यात डाळिंबाचे सर्वाधिक्ष क्षेत्र आहे. डाळिंब पोषक वातावरण आणि काटेकोर नियोजन यामुळे डाळिंबाचे चांगले उत्पादनही शेतकऱ्यांच्या हाती पडायचे.
बाजारपेठेत डाळिंबाची मागणी कमी आणि पुरवठा अधिक यामुळे डाळिंबाचे दर प्रति किलोस ८० ते ९० रुपयांपर्यंत मिळायचे. मात्र, गेल्या वर्षापासून डाळिंबाचे क्षेत्र घटले असून उत्पादनही कमी झाले आहे.
त्यामुळे डाळिंबाचे दरात वाढ झाली आहे. यंदा मगृ बहारापासूनच डाळिंबाचे दर प्रत किलोस १०० ते १५० रुपयांच्या पुढे होते. हस्त बहारातही असेच दर आहेत. गेल्या पाच वर्षातील यंदा डाळिंबाचे उच्चांकी दर आहेत.
-यंदाचा मृग आणि हस्त बहारातील डाळिंबाला चांगले दर मिळाले आहेत. गेल्या पाचवर्षापेक्षा यंदा डाळिंबाला उच्चांकी दर आहेत. पुढील वर्षीही डाळिंबाच्या दरात तेजी राहिली अशी सध्यातरी आशा आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ