भाव खाणाऱ्या टोमॅटोला बाऊन्सर्सची सुरक्षा - पोलिसांनी भाजीवाल्याला उचललं; प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या वाराणसीत टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात करणाऱ्या दुकान मालक आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस भाजी विकणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला शोधत आहेत. अजय फौजी असं त्याचं नाव आहे. लंका पोलीस ठाण्यात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाराणसी पोलिसांनी तीन ज्ञात आणि एका अज्ञाताविरोधात लंका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५, १३५ ए, ५०५ (२) च्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. नगवा परिसरात रविवारी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं भाजी विक्रेता बनून एक अनोखं आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केला होता.
समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अटकेवरुन अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. 'ज्या देशात, प्रदेशात टीकाटिप्पणी स्थान नाही, तिथे दुसऱ्यांना घाबरवणारी सत्ता स्वत:च घाबरली असल्याचं समजावं. 'मदर ऑफ डेमोक्रसी'ची गोष्ट या परिस्थितीत जुमला वाटते. देशाच्या प्रमुख लोकसभा मतदारसंघात ही अवस्था असेल, तर बाकीकडे काय परिस्थिती असेल?', असा सवाल यादव यांनी उपस्थित केला.
भाजीवाल्याची सुटका लगेगच व्हायला हवी, असं यादव याआधी म्हणाले होते. 'वाराणसीत महागाईसारख्या जनहिताच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधू पाहणाऱ्या भाजीवाल्याला पोलीस ठाण्यात बसवणं किती योग्य आहे? ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर राज्यातील सर्वच भाजीवाले आक्रोश व्यक्त करत आहेत. त्या भाजीवाल्याला लगेचच सोडायला हवं,' अशी मागणी त्यांनी केली.