शरद पवार यांचा पहिल्यांदाच पुतण्याला थेट सवाल - अजित पवार यांना ‘त्या’ घटनेचीही करून दिली आठवण
सातारा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून राष्ट्रवादीच्या बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, असा निर्वाणीचा इशाराच दिला आहे. तसेच आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही, कुणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्त्यानेच जाणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
संघर्षाला सुरुवात करायची असेल किंवा नवीन काही निर्माण करायचं असेल तर मी दोन शहरांची नेहमी निवड करतो. एक सातारा आणि कोल्हापूर या दोन शहरातून मी नव्या गोष्टीची सुरुवात करत असतो. राष्ट्रवादीचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला, अपेक्षा होती की त्यांनी हे संघटन महाराष्ट्रात मजबूत करावं. पण नुसतं मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशात भाजपच्या माध्यमातून समाजात जातीजातीत, धर्माधर्मात एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समतेसाठी प्रयत्न करणं ही आमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे, असं शरद पवार म्हणाले.
म्हणून दौरा सुरू केला
आमच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने अनेक वर्ष मोलाची कामगिरी केली. ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे. त्यांच्यासोबतच ते गेले. पण नवीन पिढीचा कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये तो जोमाने उभा राहावा म्हणून मी आजपासून हा दौरा सुरू केला आहे, असं पवार म्हणाले.
कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा
मी गाडीत बसल्यापासून इथे येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 70 ते 80 टक्के तरुण मजबूतीने स्वागताला उभे होते. हे चित्रं पाहतोय. आम्ही कष्ट केलं, या तरुणांना दिशा दिली, कार्यक्रम दिला तर दोन ते ते तीन महिन्यात राष्ट्रवादीला महाराष्ट्राला चित्र अनुकूल होईल. त्याची सुरुवात इथे झाली. याचा आनंद आहे. आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी महत्त्वाची मोहीम सुरू करायची म्हणून यशवंतरावांच्या समाधीस्थळापासून आम्ही सुरुवात केली, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवार परके नव्हते
मला काही लोकांनी टेलिफोन केले. पक्षाच्या मूळ धोरणापासून वेगळी भूमिका घेऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं, असं ते म्हणाले. अमोल कोल्हे यांनी तुम्हाला आज पाठिंबा दिला आहे. पण काल ते अजित पवार यांच्यासोबत होते, असं विचारलं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार काही परके नव्हते. माझी मुलगी तीनदा तिथे गेली. याचा अर्थ चुकीचं काम केलं नाही. मतभिन्नता असते. त्यामुळे तो जाणून घेण्यासाठी एखादा सहकारी गेला असेल तर त्यावर मी संशय व्यक्त करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कारवाई करणार नाही
आम्ही कुणावर कारवाई करणार नाही. अपात्रता करणार नाही. मी या रस्त्याने जाणार नाही. तुमच्या सारखे सूज्ञ बुद्धीचे लोक असेल तोच त्यांना आशीर्वाद हा शब्द कळेल. मी जाहीरपणे पक्षाच्या बांधणीसाठी निघालो. असं असताना आशीर्वाद हा शब्द वापरून तुम्ही पत्रकारांचा दर्जा कमी करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
तेव्हा चूक झाली वाटलं नाही का?
शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही, असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावरही पवार यांनी उत्तर देत अजितदादांना फटकारलं. अडीच वर्ष आम्ही शिवसेनेसोबत काम केलं. त्यावेळी तुम्ही मंत्री होता. तेव्हा शिवसेनेसोबत चूक झाल्याचं का वाटलं नाही? असा सवालच त्यांनी केला.
देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी राजकीय पक्ष आणि मीडियाने इंदिरा गांधींवर टीका केली होती. तेव्हा इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य होती असं सांगणारा एकच नेता होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि आणीबाणीला पाठिंबा देणारा एकच पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारही दिले नव्हते. इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही काही वेगळी भूमिका घेतली नाही. आजच घडतं असं नाही, अशी आठवणही त्यांनी सांगितली.