सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकाला पुन्हा अकरा महिन्यांची मुदतवाढ
Solapur Cooperative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील प्रशासकांना राज्याच्या सहकार विभागाने मार्च २०२४ पर्यंत अकरा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. प्रशासकाला दिलेल्या या मुदतवाढीमुळे सध्या तरी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा विषय तूर्त तरी लांबला आहे.
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ बरखास्त करून मे २०१८ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच ही मुदत संपली, त्यावेळी ३ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतही आता अवघ्या महिन्यावर येऊन ठेवली असताना, आता पुन्हा एकदा अकरा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
सततच्या या मुदतवाढीमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात असले, तरी त्यासाठी सहकार विभागाने सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ११० (अ) (१) (३) मधील तरतुदीतील कलम १५७ अन्वये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला सूट देण्यात आली आहे, त्यानुसार हा आदेश काढल्याचे म्हटले आहे.
सध्या बँकेवर कुंदन भोळे हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. या आधी शैलेश कोतमिरे यांच्याकडे पदभार होता. त्यांनी बँकेच्या आर्थिक व्यवसायवृध्दीसाठी प्रयत्न केले.
काही संस्थांकडील बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे बँक नफ्यात आली. पण बिगर शेती कर्जाच्या वसुलीचा आकडा तब्बल ११०० कोटी रुपयांवर आहे.त्याच्या वसुलीमध्ये मात्र त्यांना फारसे यश मिळालेले नाही. आता श्री. भोळे यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नव्याने मिळालेल्या मुदतवाढीमुळे ते यावर काम करतील, अशी अपेक्षा आहे.
बँक सध्या आर्थिकदृष्ट्या नफ्यात आली आहेच. मुदतवाढ मिळाल्याने येत्या वर्षभरात सर्व प्रयत्न करून बिगरशेती कर्जाच्या वसुलीसह बँकेची आर्थिकस्थिती आणखी सुधारण्याचा प्रयत्न करु.
कुंदन भोळे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर