कंटेनरमध्ये बेसन आणि सोयाबीनच्या गोण्यांमागे होतं असं काही... पाहताच पोलिसांना फुटला घाम...
अहमदनगर : सध्या देशात अंमली पदार्थाच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतेच इंदौरमधून गुटखा तस्करीचं प्रकरण समोर आलं आहे. इंदौरहून कंटेनरमध्ये सोयाबीन आणि बेसनच्या गोण्यांच्या मागे बेकायदा गुटख्याच्या शेकडो गोण्या भरून पुण्याच्या दिशेने जात होत्या. या कंटेनरला कोपरगाव तालुका पोलिसांनी तालुक्यातील येसगाव शिवारात नगर मनमाड महामार्गावरून ताब्यात घेतलं आहे. या कंटेनरमध्ये गुटख्याच्या लाखो रुपये किंमतीच्या शेकडो गोण्या आढळून आल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याकडून ५० लाखांचा गुटखा आणि कंटेनरसह कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एक कंटेनर सोयाबीन आणि बेसन पीठाच्या गोण्यांच्या मागे अवैध पद्धतीने महाराष्ट्र राज्यात कायद्याने बंदी असलेल्या गुटख्याच्या गोण्या भरून वाहतूक होत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपल्या फौजफाट्यासह येसगाव शहरात पोहोचले. त्यांनी चालत्या कंटेनरला अडवून खात्री केली असता त्यामध्ये गुटख्याच्या शेकडो गोण्या आणि बॉक्स मिळून आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कंटेनरमधून सर्व गोण्या बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर चालक जमील अहमद इद्रिस अहमद राहणार हरियाणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.